सिंधुदुर्ग जिल्हा - भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक
हिरव्यागार निसर्ग सौंदर्याने नटलेला सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील पर्यटनदृष्ट्या एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. पश्चिम घाट व अरबी समुद्र या दरम्यान हा भूप्रदेश वसला असून वैविध्यपूर्ण जैवविविधता आणि स्वच्छ, सुंदर सागरकिनारे हे या जिल्ह्याचे प्रमुख आकर्षण आहे. साधारणपणे १२० किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभलेल्या या जिल्ह्याचा भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसाही लक्षणीय स्वरूपाचा आहे. प्राचीन काळातील अनेक महत्वाची मंदिरे, पुरातन गड – किल्ले व वास्तू त्याची साक्ष देतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेला हा जिल्हा अनेक नररत्नांची खाण म्हणूनही ओळखला जातो.
- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 5,207 चौकिमी आहे. 2011 च्या जनगणनेप्रमाणे या जिल्ह्याची लोकसंख्या 8,49,651 इतकी होती. आधुनिकीकरण करण्यात आलेले सिंधुदुर्गनगरी (ओरोस) हे ठिकाण जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला कोल्हापूर, उत्तरेला रत्नागिरी हे जिल्हे तर दक्षिणेला गोवा राज्य आणि अंशत: कर्नाटक राज्य पसरले आहे.
- सिंधुदुर्ग जिल्हा समुद्रकिनारी असल्यामुळे येथील हवामान उष्ण व दमट आहे. हवेतील आर्द्रतेमुळे तापमानातील उष्णता फारशी जाणवत नाही.
- जिल्हा मुख्यालयी पोहोचण्यासाठी कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या प्रमुख शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाने जाता येते. सिंधुदुर्गनगरी व कुडाळ ही जवळीची रेल्वे स्थानके असून, कणकवली, सावंतवाडी या रेल्वे स्थानकांवरूनही येथे पोहोचता येते. वेंगुर्ले तालुक्यातील नवनिर्मित चिपी विमानतळ, रत्नागिरी, बेळगाव (कर्नाटक) तसेच दाभोलीम व मोपा (गोवा) ही या जिल्ह्यासाठी जवळची विमानतळे आहेत.
- वाघोटन, देवगड ,कर्ली ,गडनदी, तिलारी व तेरेखोल या सहा मोठ्या नद्या जिल्ह्यातून वाहतात. या सर्व नद्या सह्याद्रीच्या डोंगररांगात उगम पाऊन अरबी समुद्रास जाऊन मिळतात. पावसाळ्यात नद्या रौद्ररूप धारण करून वाहतात. तर इतर वेळी विशेषतः उन्हाळ्यात सह्याद्री पट्ट्यातील भागात पाण्याची पातळी फारच कमी होत जाते. समुद्रालगतच्या भागात भरती ओहोटीमुळे खाऱ्या पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्याशिवाय सुख – शांती, जानवली, निर्मला, मोचेमाड अशा अनेक लहान लहान नद्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा परिसर कृषीसमृद्ध बनला आहे.
- जिल्ह्यातील नद्यांची पात्रे उथळ असल्यामुळे त्यांचा जलवाहतुकीसाठी फारच कमी प्रमाणात उपयोग होतो. तेरेखोल, कर्ली, कालावल, आचरा, मोचेमाड व देवगड या प्रमुख खाड्या असून त्यांचा उपयोग जहाजे नांगरण्यासाठी होतो. या खाड्यांमधून लहान होड्यांनी वाहतूक होते व मोठ्या प्रमाणावर मासेमारीही केली जाते.
- येथील सरासरी पर्जन्यमान २७५० मिमी पेक्षा अधिक आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बहुतांश भाग हिरव्या वनराईने नटलेला असून पर्यटन क्षेत्रास मोठी चालना मिळत आहे.
- जिल्ह्यामध्ये यशवंतगड (वेंगुर्ले), रांगणा गड , मनोहर मनसंतोष गड (कुडाळ), पारगड (दोडामार्ग) सिंधुदुर्ग (मालवण ), विजयदुर्ग (देवगड) असे महत्त्वाचे डोंगरी व सागरी किल्ले आहेत.
- सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास :
प्राचीन काळात येथे चालुक्य व शिलाहार या राजघराण्यांची तर मध्ययुगीन काळात विजापूरच्या आदिलशाहीची सत्ता असल्याचे उल्लेख सापडतात. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेनंतर हा प्रदेश मराठा साम्राज्यातील आरमार दलाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असल्याचे दिसून येते.
- छत्रपती शिवाजी महाराज आणि सिंधुदुर्ग
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारी सत्तेची उभारणी करण्याकरता मालवण जवळील कुरटे बेटावर एक जलदुर्ग बांधला. तोच हा सिंधुदुर्ग किल्ला ! या किल्ल्याच्या नावावरूनच सिंधुदुर्ग असे नाव जिल्ह्याला देण्यात आले.
सागरी मार्गाने होणारी परकीयांची आक्रमणे रोखण्यासाठी आणि त्यांना जरब बसवण्यासाठी छ. शिवरायांनी हा अभेद्य जलदुर्ग इसवी सन १६५६ मध्ये बांधला.
आजही या किल्ल्याची तटबंदी आणि बांधणी वास्तुकलेचा एक नमुना म्हणून पाहण्यासारखी आहे. छ. शिवरायांनी वाघोटन खाडीत गिर्ये येथे आरमारी बोटींची बांधणी करण्याकरता बांधलेली सुसज्ज गोदी, आवश्यक त्या दुरुस्त्या करून अधिक बुलंद बनवलेला रेडीचा यशवंत गड आणि विजयदुर्ग किल्ला हे त्यांच्या सागरी रणनीतीचे उत्तम आविष्कार आहेत.
- वसाहत आणि इंग्रजांचा प्रभाव :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, सिंधुदुर्ग जिल्हा मराठा साम्राज्याच्या वर्चस्वाखाली काही काळ राहिला असला तरी इंग्रजांनी १८ व्या शतकाच्या मध्यात संपूर्ण भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. साहजिकच सिंधुदुर्गसारख्या किनारपट्टी क्षेत्रांवरही त्यांचा प्रभाव वाढलेला दिसतो. येथील अनेक नैसर्गिक बंदरांची पुनर्बांधणी इंग्रजांनी केल्याचे दिसून येते.
- स्वातंत्र्य संग्राम आणि सिंधुदुर्ग :
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. येथील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढा दिला असल्याचे इतिहास सांगतो. शिरोडा येथे १९३० साली झालेला मिठाचा सत्याग्रह ही त्याची एक साक्ष आहे. या सत्याग्रहाचे नेतृत्व आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी केले होते. अनंतराव नाबर, विष्णुपंत खटखटे, रामभाऊ परब अशी अनेक नावे भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित आहेत. आझाद हिंद सेनेचे सरसेनापती जनरल जगन्नाथराव भोसले हे याच जिल्ह्याचे सुपुत्र होत.
- सिंधुदुर्गातील काही पुरातन वास्तू व गड किल्ले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पुरातन वास्तू आज पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या ठरत आहेत. बांदे येथील रोझे (रेडे) घुमट, बैल घुमट, वेंगुर्लेमधील डच वखार व ब्रिटीशकालीन शासकीय विश्रामगृह, सागरेश्वर मंदिर तसेच निवतीचा किल्ला, घोड्यांना थेट विहिरीत उतरून पाणी पिण्यासाठी बांधलेली कुडाळ येथील दगडी पायऱ्यांची घोडेबाव, यक्षिणी मंदिर (माणगाव), लक्ष्मीनारायण मंदिर (वालावल) सावंतवाडीतील खेमसावंतांचा राजवाडा, मालवण येथील सर्जेकोट, राजकोट, इनामदार श्री देव रामेश्वर (आचरे) देवगड - वाडा येथील विमलेश्वर मंदिर इत्यादी. तसेच रांगणा गड, मनोहर मनसंतोष गड , सदानंद गड (साळशी – देवगड) भरत गड, भगवंत गड (मालवण मसुरे ) पारगड ( दोडामार्ग) असे काही लहानमोठे गड किल्ले पर्यटनाच्या दृष्टीने आज महत्त्वाचे ठरत आहेत.
- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सांस्कृतिक महत्त्व
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सांस्कृतिक परंपरा आणि विविध उत्सव साजरे केले जातात . पारंपरिक लोककला ‘दशावतार’ ही या जिल्ह्याचे खास वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे चित्रकथी, गंजिफा, कोळीनृत्य, शिमागोस्तव, तसेच इतर स्थानिक ग्रामदेवतांचे जत्रौत्सव लोकसंस्कृतीच्या दृष्टिने अभ्यसनीय आहेत. महाशिवरात्रीला भरणारी कुणकेश्वर यात्रा, आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीची जत्रा, तुळस – वेंगुर्ला येथील जैतीर जत्रौत्सव, आचरे गावची गावपळण इ.
सिंधुदुर्गची खाद्यसंस्कृतीही विविध प्रकारांनी समृद्ध आहे. त्यातही मालवणी खाजे, घावन चटणी, शिरवाळे, वडे सांगोती आणि मालवणी पद्धतीने बनवले जाणारे मासे आणि इतर सीफूड विशेष लोकप्रिय आहे .
सिंधुदुर्ग जिल्ह्याची भूमी ही अनेक विभूती, कवी, लेखक, कलावंत, राजकीय धुरीण यांनी समृद्ध आहे. माणगावचे दत्त स्वरूप टेंबे स्वामी, दाणोलीचे सद्गुरू साटम महाराज, कणकवलीचे पूज्य भालचंद्र महाराज, तळवणेचे श्री महंत परशुराम भारती महाराज, इन्सुली – बांदा येथील नाथपंथी योगी सोहिरोबानाथ आंबिये अशा अनेक संत महात्म्यांनी या भूमीचे आध्यात्मिक भरण पोषण केले आहे. तर कोकणचे गांधी म्हटले जाणारे अप्पासाहेब पटवर्धन, बॅ. नाथ पै, जयानंद मठकर, भाईसाहेब सावंत अशा राजकीय धुरिणांनी या जिल्ह्याची सामाजिक व राजकीय जाण समृद्ध केली आहे.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर, मालवणी बोलीतील पहिले कवी वि. करू. नेरुरकर, पद्मभूषण मंगेश पाडगावकर, जयवंत दळवी, चिं. त्र्यं. खानोलकर, नाटककार मामासाहेब वरेरकर, मधुसूदन कालेलकर साहित्य सम्राट न. चिं. केळकर, मे. पुं. रेगे, कवी वसंत सावंत, हरिहर आठलेकर, सतीश काळसेकर, आ. ना. पेडणेकर, कवी तुलसी परब, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक असे महान साहित्यिक या जिल्ह्याने मराठीला दिले आहेत. साहित्यातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले लेखक वि. स. खांडेकर यांची सिंधुदुर्ग कर्मभूमी तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दुसरे लेखक कवी विंदा करंदीकर यांची ही जन्मभूमी होय.
बालगंधर्व युगाचे साक्षीदार सुप्रसिद्ध संवादिनीवादक पं. पुरुषोत्तम वालावलकर, गायनाचार्य पं. रामकृष्णबुवा वझे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार बाबुराव सडवेलकर, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ग्रेट रॉयल सर्कसचे मालक नारायण वालावलकर, प्राच्यविद्या पंडित सर रा. गो. भांडारकर, भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर बी. एन. आडारकर, मालवणी भाषेला साता समुद्रापार घेऊन जाणारे अभिनेते व नाट्य निर्माते मच्छींद्र कांबळी, सुप्रसिद्ध शिल्पकार नारायण सोनवडेकर, चित्रकथी अर्थात बोलक्या बाहुल्यांचे खेळ करणारे पद्मश्री परशुराम गंगावणे, त्याचप्रमाणे क्रिकेटपटू सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर, दशावतारी लोककलावंत बाबी नालंग, पांडुरंग शिरसाट, बाबी कलींगण अशी अनेक महनीय नावे या जिल्ह्याच्या सांस्कृतिक , साहित्यिक व कलात्मक संदर्भाने सांगता येतील.
- आधुनिक काळ :
1 मे 1981 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर या जिल्ह्याने दळणवळण, कृषि, पर्यटन, उद्योग - व्यवसाय अशा अनेक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. शिरोडा, वेंगुर्ला, निवती, भोगवे ,मालवण, तारकर्ली, देवबाग इ. ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत आहेत. त्यामध्ये स्कुबा डायविंग, पॅरासेलिंग, स्पीड बोट, स्नोर्कलिंग, डॉल्फिन वॉचिंग, कायाकिंग , बंपर रायडींग अशा वॉटर स्पोर्टचा समावेश आहे. कृषी – पर्यटनाच्या दृष्टीने माडखोल, केसरी, घुमडे, निसर्ग पर्यटन - मणेरी, झरेबांबर – पिकुळे, वाइल्डर नेस्ट- विर्डी, वानोशी- कुडासे ( दोडामार्ग) ही ठिकाणे विकसित होत आहेत. तसेच आंबोलीसह मांगेली (दोडामार्ग) सावडाव, नापणे, मणचे येथील व्याघ्रेश्वर इ. ठिकाणचे धबधबे पर्यटकाना आकर्षित करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण, आरोग्य तसेच इतर इन्फ्रास्ट्रक्चरल विकासामध्ये गतिमान प्रगती करणारा जिल्हा म्हणून आज महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक आणि सांस्कृतिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे .
जैवविविधतेसह भौगोलिक आणि सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा लाभलेला महाराष्ट्रातील एक समृद्ध जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख आज जागतिक पटलावर घेतली जात आहे. ही ओळख अशीच पुढे निरंतर राहील अशी उमेद आहे.