जिल्हा परिषदे विषयी
कोकण विभागातील दक्षिण भागाचा औद्योगिक व कृषी क्षेत्रामध्ये जलद विकास साध्य व्हावा आणि विकास योजनांची अंमलबजावणी कार्यक्षमतेने व्हावी या दृष्टिकोनातून स्थानिक लोकांच्या मागणीचा विचार करून दि. 1 मे 1981 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनारपट्टीचा दक्षिणेकडील भाग म्हणजे नवनिर्मित सिंधुदुर्ग जिल्हा होय. जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर आपला कारभार लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरणीय आणि इतर विकासात्मक योजनांमध्ये आजवर धोरणात्मक व दिशादर्शक काम केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद:
- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्यालय ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे आहे.
सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत एकूण 8 पंचायत समित्या व 431 ग्रामपंचायती कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान मान. श्री.आर.बी.दळवी यांना प्राप्त झाला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे कार्य व संघटन
जिल्हा परिषद एक निर्वाचित संस्था असते. तिचे नेतृत्व जिल्हा परिषद अध्यक्ष करतो. सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्यांची निवड होत असते. जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्यांचे कार्यक्षेत्र विविध शासकीय योजनांचा अंमलबजावणी, विकास कामाना प्राधान्य देऊन ती पूर्णत्वास नेणे आणि सामाजिक कल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत लोकाभिमुख प्रशासन कारभार करणे या स्वरूपाचे असते.
- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी (CEO) आणि इतर कर्मचारी या कार्याचे संचालन करतात. त्यांच्याकडून प्रशासनाच्या सर्व शासकीय योजनांचे कार्य अंमलात आणले जाते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आपल्या स्थापना काळापासून आजवर मुख्यतः स्थानिक विकास, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सामाजिक कल्याण, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधांची उभारणी आणि इतर विकासात्मक कार्य पंचायत समिती, ग्रामपंचायत इ. स्तरावर सुनियोजित पद्धतीने कार्यान्वित केले आहे. त्यास अनुसरून सन 2008 साली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आय.एस.ओ. 9001:2000 मानांकित झाली आहे.
- ‘यशवंत पंचायत राज’ अभियान 2006-07, 2013-14, 2014-15 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने राज्यस्तरावर तृतीय क्रमांक , सन 2017-2018 मध्ये राज्यस्तरावर द्वितीय व सन 2018-19 मध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
- भारतातील पहिला स्वच्छ जिल्हा तसेच हागणदारीमुक्त जिल्हा म्हणूनही जिल्हा परिषदेने राज्य स्तरावर सन्मान प्राप्त केला आहे.
- ‘स्व. दीनदयाळ उपाध्याय पंचायत राज सशक्तीकरण अभियान 2018’ अंतर्गत राज्यस्तरावर जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
१. शैक्षणिक कार्ये
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा यांचे संचालन करताना शाळांच्या भौतिक समृद्धतेसह विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला आहे. शैक्षणिक सुधारणा आणि त्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी जि. प. ने विविध शासकीय योजनांची कार्यक्षम अंमलबजावणी केली आहे.
२. आरोग्य योजना
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील खेडोपाडी उत्तम दर्जाची आरोग्य सेवा पुरवण्याची जबाबदारी घेतली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रे यांच्या मार्फत लोकांना लहान-मोठ्या आजारांच्या उपचारांपासून ते अन्य सुरक्षात्मक आणि रोग प्रतिबंधात्मक सेवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिल्या जातात.
३. सामाजिक कल्याण
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विविध सामाजिक कल्याण योजनांमध्ये सहभागी आहे. यामध्ये महिला आणि बालकल्याण, वृद्धापकाळ सेवा, अपंग कल्याण, तसेच इतर कल्याणकारी योजना समाविष्ट आहेत. जिल्हा परिषदेने आदिवासी व मागासवर्गीय वस्ती सुधारणा, बंधनमुक्ती योजना यशस्वीरीत्या राबवल्या आहेत.
४. पाणीपुरवठा आणि स्वच्छता
पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या बाबतीत जिल्हा परिषद महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यासाठी विविध योजना राबवण्यात येतात. जलसंधारण, पाणीवापराचे संरक्षण, तसेच गटवस्तीय स्वच्छता आणि गटग्राम स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी विविध उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतले आहेत.
५. पायाभूत सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील दळणवळणाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी रस्ते, सार्वजनिक बांधकाम आणि इतर विकास कामांसाठी शासकीय योजनांची कार्यक्षम अंमलबजावणी केली आहे. पायाभूत सार्वजनिक सुविधा उभारण्यासाठी जिल्हा परिषद प्राधान्याने काम करत आहे.
६. कृषी व विकास कार्ये
सिंधुदुर्ग जिल्हा हा प्रामुख्याने कृषीप्रधान जिल्हा असल्यामुळे जि. प. ने कृषी क्षेत्र विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धोरणात्मक निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली आहे. जिल्हा परिषद शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजना, खते व बियाणांचा पुरवठा, सिंचन योजना, पाणी व्यवस्थापन, शेतमाल प्रक्रिया आणि विक्री इत्यादी बाबींसाठी नियोजनबद्ध काम करत आहे. तसेच भात, नाचणी या तृणधान्य पिकांसह आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम इ. फळ बागायती कृषी क्षेत्र विकसित करण्यावर जि. प. भर देत आहे.
७. पर्यटन आणि पर्यावरण संरक्षण:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी व कृषी आधारित पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देत आहे. त्याचबरोबर पर्यावरण आणि येथील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषद आग्रही आहे. यासंदर्भात विविध शासकीय योजना राबवल्या जात आहेत.
प्रमुख योजनांचा समावेश:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय योजनांची अंमलबजावणी करते. त्यात मातृ-शिशु कल्याण योजना, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, जलशक्ती अभियान, शालेय पोषण आहार योजना, आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांचा समावेश आहे.
निष्कर्ष:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद हा स्थानिक प्रशासनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे आणि या संस्थेचे कार्य जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शैक्षणिक, आरोग्य, पाणीपुरवठा, कृषी आणि सामाजिक कल्याण, तसेच पर्यावरण संरक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये जिल्हा परिषद काम करत आहे. जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी या संस्थेचे कार्य आणखी प्रभावी होईल, अशी आशा आहे.